बाईकवरील व्यापाऱ्यावर हल्ला करून दोन लाखाची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 03:17 PM2021-02-03T15:17:44+5:302021-02-03T15:18:10+5:30
Crime News पाळत ठेवलेल्या तीन चोरट्यांपैकी धावत्या गाडीवरून व्यापाऱ्यावर हल्ला केला.
गंगाखेड : दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याच्या कानशिलात लगावून तीन चोरट्यांनी १ लाख ९५ हजार ५०० रक्कमेची बॅग पळविल्याची घटना मंगळवारी ( दि. २) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास वकील कॉलनी परिसरात घडली. धावत्या गाडीवर हल्लाकरून घराजवळच व्यापाऱ्याला लुटल्याच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुणाल अनिल यानपल्लेवार ( ३० वर्षे रा. देवळे जिनिंग परिसर, गंगाखेड ) यांचे शहरातील वकील कॉलनीत सुपर शॉपी नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री ९:३० वाजेदरम्यान दुकान बंद करून ते बॅगेत रोख १ लाख ९५ हजार ५०० रुपये घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले. घराजवळ आले असता त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या तीन चोरट्यांपैकी धावत्या गाडीवरून त्यांच्यावर हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने यानपल्लेवार दुचाकीवरून खाली पडले. लागलीच चोरट्यांनी रोख रक्कमेची बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून फरार झाले. यानपल्लेवार यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते.
याप्रकरणी कुणाल अनिल यानपल्लेवार यांनी मध्यरात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि विठ्ठल घोगरे हे करीत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सपोनि विकास कोकाटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल घोगरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकाबंदीच्या सूचना दिल्या. मात्र, याचा काहीच फायदा झाला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरते कैद झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, मध्यवस्तीत असलेल्या बाजार पेठेतून व्यापाऱ्याजवळील रोख रकमेची बॅग पळविल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.