चालत्या दुचाकीवर रिल बनवताना झालेल्या अपघातात दाेघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 06:34 AM2023-01-28T06:34:55+5:302023-01-28T06:35:16+5:30
लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे.
पाथरी (जि. परभणी) :
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जाताना रिल बनवत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे, योगानंद कैलास घुगे, शंतनू सोनवने या चारही विद्यार्थ्यांना उपचारासाठी अंबाजोगाईला आणण्यात आले होते. त्यातील स्वप्निल चव्हाण या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास तातडीने लातूरला हलविले होते. अंबाजोगाईत उपचार घेणाऱ्या शंतनू कांचन सोनवणे याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.
हात रस्त्यावर तुटुन पडला
पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री येथील इयत्ता नववीतील चार विद्यार्थी सकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून कानसूर फाटा येथील हायस्कूलमध्ये ध्वजारोहणासाठी निघाले होते. डाकूपिंप्री ते कानसूर फाटा येथून जाताना शाळेच्या अगदी जवळ काही अंतरावर दुचाकीवरून हे विद्यार्थी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रिल बनवत होते. त्यांचा व्हिडीओ मोबाइलमध्ये कैद झाला. मात्र, काही वेळात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर अपघात झाला. यात एका विद्यार्थ्याचा हात अक्षरशः रस्त्यावर तुटून पडला होता.
लातूरला उपचार घेणाऱ्या स्वप्निलचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे डाकूपिंप्री गावावर शोककळा पसरली आहे.