वऱ्हाडासाठी थांबलेल्या जीपवर भरधाव दुचाकी आदळली; एकजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 01:47 PM2021-07-13T13:47:10+5:302021-07-13T13:48:41+5:30
Accident at Parabhani : कापसी फाट्यावर पालमकर यांच्या आखाड्याजवळ लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी जीप उभी होती.
पालम ( परभणी ) : गंगाखेड ते पालम मार्गावरील कापसी फाट्यावर सकाळी (दि. १३ ) ९:३० वाजता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीपवर पालमकडे जाणारी दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार मदन शंकरराव आपशेटे ( ३४ ) गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वारास अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
गंगाखेड येथून मदन शंकरराव आपशेटे हे एकासह दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २२ वाय ९१८० ) पालमकडे येत होते. कापसी फाट्यावर पालमकर यांच्या आखाड्याजवळ लग्नाचे वऱ्हाड नेण्यासाठी जीप उभी होती. जीपमध्ये वऱ्हाडी बसत असतानाच पाठीमागून भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार मदन शंकरराव आपशेटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर जीपमधील एक प्रवासी जखमी झाला. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, जमादार केजगीर यांनी धाव घेत जखमींना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मदन आपशेटे यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे.