बस स्थानक, रेल्वे भागातून दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:10+5:302021-08-12T04:22:10+5:30
परभणीतील एसटी आगारात वाहक म्हणून नोकरीस असलेले लक्ष्मण ज्ञानदेव पवार यांनी त्यांनी एम.एच. २२, एएफ १९७७ क्रमांकाची दुचाकी ७ ...
परभणीतील एसटी आगारात वाहक म्हणून नोकरीस असलेले लक्ष्मण ज्ञानदेव पवार यांनी त्यांनी एम.एच. २२, एएफ १९७७ क्रमांकाची दुचाकी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता बसस्थानक परिसरात उभी केली होती. ड्युटी केल्यानंतर रात्री ११ वाजता ते संबंधित ठिकाणी आले असता त्यांची दुचाकी जागेवरून गायब झाली होती. याबाबत त्यांनी ९ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना परभणी शहरातील रेल्वे स्टेशन भागात घडली. दादाराव बाबुराव गायकवाड हे नांदेड येथे नोकरीस आहेत. ते परभणी ते नांदेड दररोज रेल्वेने ये-जा करतात. त्यांनी त्यांची एम.एच. २२, एजी ३९३६ क्रमांकाची दुचाकी ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या रेल्वे रेस्ट हाऊसमधील गेटच्या आत झाडाखाली उभी केली होती. त्यानंतर ते नांदेडला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १०. ५० वाजता ते परत आले असता संबंधित जागेवर दुचाकी आढळून आली नाही. याबाबत दादाराव गायकवाड यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात ९ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना मानवत येथे घडली. प्रवीणकुमार माणिकचंद वर्मा यांनी त्यांची एम.एच. २२, एएफ १३८८ क्रमांकाची दुचाकी २४ जुलै रोजी घरासमोरील रिकाम्या जागेत उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी संबंधित जागेवर दिसून आली नाही. याबाबत वर्मा यांनी ६ ऑगस्ट रोजी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.