परभणीत दुचाकी, चारचाकी वाहनास प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:51 PM2020-03-23T22:51:12+5:302020-03-23T22:51:40+5:30
कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय चारचाकी व दुचाकी वाहनांना रस्त्यावरुन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता रस्त्यांवरील वाहतूकही प्रशासनाने प्रतिबंधित केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या असून त्यात चारचाकी व दुचाकी वाहनांनाही अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात घर, इमारतीचे बांधकाम अनेक भागात होत असून त्या ठिकाणी गर्दी होत आहे. त्याच प्रमाणे मनाई आदेश असतानाही नागरी भागातील रस्त्यांवर खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत व या संस्थाच्या ५ कि.मी. परिसरातील सर्व बांधकामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच जिल्ह्यातील कोणत्याही चारचाकी व दुचाकी वाहनास अत्यावश्यक कामाशिवाय मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही माल वाहतूक करणारी जड वाहने, ट्रॅक्टर रस्त्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.
कोरोनासाठी २ कोटींचा निधी
परभणी : कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश शनिवारी काढण्यात आले.
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्याच्या नियोजन विभागाने २० मार्च रोजी दिले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने २ कोटी रुपयांचा निधी आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. त्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले असून ५० लाख रुपये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.