गंगाखेडमध्ये हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:37 PM2019-03-22T18:37:30+5:302019-03-22T18:41:28+5:30
वाळूने भरलेला हायवा महसुल प्रशासनाने पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
गंगाखेड (परभणी ) : वाळूने भरलेल्या हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २२ ) सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खोकलेवाडी पाटीजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून लातुर येथे हलविले आहे तर वाळूने भरलेला हायवा महसुल प्रशासनाने पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
गंगाखेड ते पिंपळदरी रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या विनापरवाना वाळूने भरलेल्या हायवा वाहनाच्या चालकाने खोकलेवाडी पाटीजवळ सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील सुधाकर विठ्ठलराव बोके वय ५५ वर्ष रा. खोकलेवाडी ता. गंगाखेड यांचे दोन्ही हात व डाव्या पायाला गंभीर मार मागून फॅक्चर झाले आहे. अपघाताची घटना घडताच चालकाने पळ काढला तर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी बोके यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा गौस, परिचारिका रिता मरमट, श्रीमती सुनंदा हटकर, प्रशांत राठोड यांनी प्रथमोपचार करून गंभीर जखमी सुधाकर बोके यांना पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविले आहे.
हायवा पिंपळदरी पोलीस ठाण्यात
पिंपळदरी रस्त्यावर खोकलेवाडी पाटीजवळ दुचाकीला धडक देणाऱ्या हायवा वाहनात विनापरवाना वाळु भरलेली असल्याची माहिती समजताच राणीसावरगाव मंडळाचे मंडळ अधिकारी बालाजी लटपटे, सुप्पा सज्जाचे तलाठी भगवान सुक्रे यांनी अपघातस्थळी जाऊन पोलीस नाईक लक्ष्मणराव कांगणे यांच्या सहकार्याने अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारा वाळूने भरलेला अपघातग्रस्त हायवा पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा करून त्याचा अहवाल गंगाखेड तहसील कार्यालयात सादर केला आहे.