रेल्वे फाटकावर उभ्या दुचाकींना टेंपोची धडक; १ ठार तर तीन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 07:25 PM2018-05-02T19:25:12+5:302018-05-02T19:25:12+5:30
मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
मानवत (परभणी ): मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पाठीमागुन आलेल्या आयशर टेंपोने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक १२ वर्षीय मुलगा जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्थानका लगतच रेल्वेचे फाटक आहे. सायंकाळी येथे तपोवन एक्सप्रेस येत असल्याने रेल्वे फाटक लावण्यात आले होते. यावेळी मानवत रोड येथील साईनाथ पवार आणि त्यांचा १२ वर्षीय मुलगा विशाल हे आपल्या दुचाकीवर फाटका जवळ थांबले होते. याच दरम्यान परभणी कडुन पाथरीकडे एक आयशर टेंपो भरधाव वेगाने जात होता. फाटकाजवळ चालकाचा टेंपोवरील ताबा सुटल्याने टेंपोने पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विशाल जागीच ठार झाला तर साईनाथ हे गंभीर जखमी झाले. यासोबतच टेंपो ने आणखी एका दुचाकीला जोराची धडक दिली. यात माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील हनुमंत मुळे आणि मिरा मुळे हे पती - पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी साईनाथ पवार यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत टेंपो चालकाला ताब्यात घेतले.