परभणीतील प्रकार : बचत भवनमधील बारदाना आणि लोखंडी साहित्य गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:32 AM2018-07-19T00:32:19+5:302018-07-19T00:36:09+5:30
येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस्पर गायब केल्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स समोरील बचतभवन इमारतीतून तालुका पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेले बारदाने अचानक गायब झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. इमारत जमीनदोस्त करीत असताना हे बारदाने आढळले होते. त्याविषयी संबंधितांना फारसी माहिती नसल्याने ते परस्पर गायब केल्याचा प्रकार घडला आहे.
येथील जिल्हा स्टेडियम समोरील बचतभवनची जागा नवीन नाट्यगृह उभारणीसाठी निश्चित झाली आहे. नाट्यगृह उभारण्यापूर्वी बचतभवनची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याचे काम महापालिकेने आठ दिवसांपासून हाती घेतले आहे. तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या आदेशावरुन ही इमारत मनपा कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानेच पाडली जात आहे. बचतभवनची इमारत ही जुनी असून या ठिकाणी धान्याचा साठा केला जात होता. त्यामुळे जिल्हा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे साहित्यही याच इमारतीत ठेवले होते. इमारत पाडण्यापूर्वी महापालिकेच्या संबंधित विभागाने इमारतीतील साहित्याची कल्पना पुरवठा विभागाला देणे अपेक्षित होते; परंतु, तसे झाले नाही. इमारतीच्या सभागृहात ८६ हजार ६०० रिकामे पोते ठेवले होते. विशेष म्हणजे मे महिन्यामध्ये या पोत्यांचा लिलाव झाला होता. संबंधित कंत्राटदार काही दिवसांमध्ये पोते उचलून नेणार होता. इमारत जमीनदोस्त केली जात असल्याने दोन दिवसांपूर्वीच या कंत्राटदाराने पाहणी केली तेव्हा बहुतांश पोते गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. सुमारे ८६ हजार पोत्यांपैकी तीन ते चार हजार पोतेच शिल्लक असल्याने पुरवठा विभागातील अखत्यारितील हे पोते (बारदाना) नेमकी नेली कोणी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महापालिकेच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत ही इमारत पाडली जात असताना पोते गायब झाल्याने काही अधिकाºयांबरोबरच काही पदाधिकाºयांकडेही संशयाची सुई फिरत आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदारांनी शहरात काही ठिकाणी पंचनामे केल्याचेही चर्चा आहे. ही चर्चा वाढत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बुधवारी काहींनी नेलेला बारदाना परत जागेवर आणून टाकला. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
फाटका बारदाना आणला
बचतभवन इमारतीमधून बारदाना पळविल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधितांनी प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून नेलेला बारदाना परत आणून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र हे करीत असताना चांगला बारदाना नेऊन फाटका व कुजलेला बारदाना या ठिकाणी आणून टाकल्याचेही दिसून आले.
भंगार साहित्यही गायब
बचतभवनाची इमारत जमीनदोस्त केल्यानंतर या इमारीत वापरलेले लोखंड, सागवानी लाकूड व टीनपत्रे आदी साहित्याचा महापालिकेतर्फे लिलाव केला जाणार आहे; परंतु, या लिलावापूर्वीच अर्ध्याहून अधिक साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा होत आहे.
या सर्व प्रकाराबाबत तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता आपण मीटिंगमध्ये आहोत, नंतर बोलतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे प्रशासनाची अधिकृत बाजू समजू शकली नाही.