महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले; परभणीच्या मतदारांना केलं खास आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 03:50 PM2024-04-23T15:50:37+5:302024-04-23T15:53:05+5:30
Parbhani Lok Sabha: उदयनराजे भोसले यांनी महादेव जानकरांना मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे.
Udayanraje Bhosale ( Marathi News ) : परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हे मैदानात असून त्यांच्याविरोधात महायुतीकडून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत. मागील दोन टर्म खासदार असलेल्या संजय जाधव यांनी विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत मला संधी द्या, असं आवाहन जानकर यांच्याकडून मतदारांना केलं जात आहे. तर दुसरीकडे, बाहेरचा उमेदवार आपल्या भागाचा विकास करू शकत नसल्याचा पलटवार जाधव यांच्याकडून केला जात आहे. मात्र विकासासोबतच या मतदारसंघातील निवडणुकीला जातीय रंगही चढू लागला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये, यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने महादेव जानकर यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जानकरांना मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे.
महादेव जानकर यांना मतदानाचं आवाहन करताना उदयनराजेंनी म्हटलं आहे की, "माझे मित्र महादेव जानकर यांची शिट्टी ही खूण आहे. संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आपण सर्वांनी त्यांना शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावं," असं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे. तसंच परभणीत निश्चितपणे शिट्टी ही वाजणारच आणि जानकर यांच्या माध्यमातून विकास होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय आहे परभणीतील राजकीय स्थिती?
परभणीत लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात शिवाजीराव देशमुख वगळता आजपर्यंत कुणालाच तिसऱ्यांदा खासदार होता आले नाही. पण या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांना देशमुख यांच्या हॅट्रिकशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीतून बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
संजय जाधव हे प्रत्येकी दोन वेळा आमदार, खासदार असल्याने त्यांची मतदारसंघावर पकड आहे. तर दुसरीकडे रापसच्या जानकर यांच्या पक्षाचा मतदारसंघात एक आमदार असून महायुतीचे आमदार, पदाधिकारी त्यांच्या विजयासाठी राबताना दिसत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३४ उमेदवार आहेत. वंचितने ऐनवेळी इथून उमेदवार बदलला. हा उमेदवार किती मते घेणार म्हणजेच कुणाची आणि किती मते खाणार हा मुद्दा देखील कळीचा ठरणार आहे. यावरच विजयी कोण होणार हे ठरेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे.
परभणीसाठी संघर्ष
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी उमेदवार दिले आहेत. यात भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी महायुतीचे पदाधिकारी सामूहिक प्रयत्न करत आहेत. परंतु, परभणीतील परिस्थिती वेगळी असून, वेळेवर राष्ट्रवादीने आपली जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने महायुतीत काही ठिकाणी चलबिचल पुढे येत आहे. त्यामुळे ‘रासप’च्या उमेदवारांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सेनेचा बालेकिल्ला सर करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.