Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव
By मारोती जुंबडे | Updated: March 17, 2025 16:02 IST2025-03-17T15:56:36+5:302025-03-17T16:02:30+5:30
जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात पाणी येते. या पाण्याचा एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होतो.

Parabhani: पाण्यासाठी उद्धवसेना आक्रमक, जायकवाडीच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव
परभणी: जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी जिल्ह्यातील टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांसोबत जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास सोमवारी टाळे ठोकले. त्याचबरोबर शासनविरोधी घोषणा देत जायकवाडी कार्यालयास घेराव घातला.
जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यात पाणी येते. या पाण्याचा एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होतो. यंदा जायकवाडी प्रकल्पाकडून तीन ते चार पाणी पाळ्या रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी देण्यात आल्या. मात्र हे पाणी जिल्ह्याच्या टेल पर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचले नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी व गव्हाच्या पिकामध्ये कमालीची घट आली. त्याचबरोबर जायकवाडीचे पाणी पूर्ण क्षमतेने जिल्ह्याच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याचे वारंवार खासदार संजय जाधव यांनी प्रशासनाच्या कानावर टाकले. मात्र त्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. परिणामी, संतप्त झालेल्या खासदारांच्या समर्थकांकडून सोमवारी जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यालयास टाळे ठोकून घेराव घालण्यात आला. या आंदोलनात सभापती पंढरीनाथ घुले, गंगाप्रसाद आणेराव, रावसाहेब रेंगे, काशिनाथ काळबांडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता.