चोरट्यांची अनोखी शक्कल; दुकानातील रोकड,चांदीच्या शिक्क्यांसोबत सीसीटीव्हीचे डीव्हीआर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:45 PM2022-03-04T17:45:21+5:302022-03-04T17:47:08+5:30
चोरट्यांनी नगदी रोकड तसेच चांदीचे शिक्के व अन्य साहित्य लंपास केले
परभणी : शहरातील मोंढा बाजार समिती परिसरातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी नगदी रोकड तसेच चांदीचे शिक्के व अन्य साहित्य लंपास केले आहे. ही घटना ३ मार्चच्या मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान घडली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कोणताही सुगावा पोलीसांच्या हाती लागू नये यासाठी चक्क सीसीटीव्ही फुटेज साठविणारे डीव्हीआरच पळविले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात प्रदीप बाळकृष्ण जाजू यांचे गोपाल कॅंनव्हासिंग कंपनी नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर चोरट्यांनी वाकविले. त्यानंतर लाँक असलेल्या दरवाजाचे काच तोडून आत प्रवेश करीत गल्यातील ४२ हजार, गोशाळेचा साठविलेला ८ हजार निधी, देवासमोर ठेवलेले पूजेचे ३ हजार आणि चांदीचे ४० शिक्के असा ऐवज चोरून नेला. तसेच दुकानातील साहित्याची नासधूस करीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर सुद्धा चोरुन नेले व वायर तोडले. याच दुकानाच्या शेजारी असलेल्या श्याम रेंगे यांच्या वरद ट्रेडर्स या दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यात ठेवलेले १५ हजार व सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरट्यांनी पळविले.
ही घटना प्रदीप जादू यांना ४ मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास समजली त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी डॉग स्कॉड आणि ठसे तज्ञांना बोलावण्यात आले होते. श्वानाने परिसरातील शंभर मीटर भागात पाहणी केली. मात्र, श्वानाला कुठलाही संशय या भागात आला नाही. प्रदीप जाजू, श्याम रेंगे या दोघांनी दोन स्वतंत्र गुन्हे कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविले आहेत.