गतीमंद बालकावर अनैसर्गिक अत्याचार, नराधमास पोक्सो कायद्यान्वये वीस वर्षे सक्तमजुरी
By राजन मगरुळकर | Published: July 23, 2024 04:53 PM2024-07-23T16:53:16+5:302024-07-23T16:53:27+5:30
परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
परभणी : जिंतूर हद्दीतील एका गावात एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या घटनेत पीडित गतिमंद अल्पवयीन बालकावर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. एफ. एम. खान यांनी मंगळवारी दिला. यात आरोपीस पोक्सो कायदा कलम चार अन्वये वीस वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जिंतूर हद्दीतील एका गावात ३ एप्रिल २०२२ रोजी घटनेत मतिमंद अल्पवयीन बालकावर आरोपी गणेश श्रीरंग शेंबडे याने पीडीतसोबत अनैसर्गिक अत्याचार केला. ही बाब उघड झाल्याने त्यानुसार या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. सदर खटला सत्र न्यायालयामध्ये चालवून सरकारी पक्षाच्या साक्षीदार साक्ष आधारे न्यायाधीश के.एफ.एम. खान यांनी आरोपी गणेश शेंबडे यास पोक्सो कायदा कलम चार अन्वये वीस वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, तसेच भादंवि. कलम ३७७ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अशी शिक्षा सुनावली.
एकूण ११ साक्षीदार तपासले
या प्रकरणात सहकारी पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित व शोधण्यासाठी गेलेले आई व नातेवाईक, तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून वरील साक्ष पुराव्याअंती ही शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील मयूर साळापूरकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी टी.ई. कोरके, कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, चंद्रकांत बानटे, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.