परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांची उडाली तारांबळ
By राजन मगरुळकर | Published: April 8, 2023 02:17 PM2023-04-08T14:17:05+5:302023-04-08T14:18:18+5:30
ज्वारीच्या पेंड्या, तसेच हळद काढणी, शिजवणी आदी कामे चालू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली.
परभणी : जिल्ह्यात शनिवारी सकाळी तसेच दूपारी विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील झरी व परिसरात शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली. ज्वारीच्या पेंड्या, तसेच हळद काढणी, शिजवणी आदी कामे चालू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली.
सकाळी दहाच्या सुमारास अचानक वातावरण बदल झाला. काही वेळाने पावसाने जोरदार हजेरी लावली. यासह पाथरी शहरात विजांच्या कडकडाटात अर्धा तास पाऊस झाला. शिवाय गंगाखेड तालुक्यातील खळी परिसरात पाऊस झाला. तसेच परभणी तालुक्यातील दैठणा परिसरासह धोंडी, माळसोन्ना, साळापुरी या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
गारपीट होण्याचा अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व जालना पुढील तीन ते चार तासात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुढील तीन तासात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.