UPSC Results :'एमएनसी'तील नोकरी सोडली; चुकांमधून शिकला, यू-ट्युबचा आधार घेतला अन् जिंकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:25 PM2020-08-04T20:25:46+5:302020-08-04T20:26:49+5:30
परभणी येथील स्रेहशारदानगर भागातील रहिवासी असलेले कुणाल मोतीराम चव्हाण युपीएससी परीक्षेत २११ व्या रँकने उत्तीर्ण
परभणी : अत्यंत बारकाईने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. एका वेळी झालेली चूक पुन्हा न करणे आणि त्या चुकांमधून शिकत गेलो आणि त्यातूनच हे यश मिळविले, असे युपीएससी परीक्षेत २११ व्या रँकने उत्तीर्ण झालेल्या कुणाल मोतीराम चव्हाण यांनी सांगितले.
परभणी येथील स्रेहशारदानगर भागातील रहिवासी असलेले कुणाल मोतीराम चव्हाण यांचे शालेय शिक्षण गांधी विद्यालय एकतानगर शाखेतून झाले. दहावी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुणे येथे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेकची पदवी प्राप्त केली. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेंगलोर येथील बॉश कंपनीत अडीच वर्षे नोकरी केली.
ही नोकरी करीत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू केली होती. मुंबई येथे एसआयएसी संस्थेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. याच दरम्यान २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. त्यानंतर दिल्ली येथे जाऊन या परीक्षेच्या तयारी लागलो. याच दरम्यान हैदराबाद येथे एम्प्लॉईज प्रोव्हीडंट फंड आॅर्गनायझेशनमध्ये अकाऊंट आॅफीसर म्हणून रुजू झालो तर दुसरीकडे परीक्षेची तयारीही सुरू होती. युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना युट्युब व्हीडिओचा मोठा फायदा झाला. युट्यूबच्या साह्याने व्हीडीओवरुन स्वत:च्या नोटस् तयार केल्या. या नोटस्चा आधार घेऊन परीक्षेची तयारी केली आणि या परीक्षेत यश संपादन केले, असे कुणाल चव्हाण यांनी सांगितले.
ध्येय निश्चित करुन विद्यार्थ्यांनी तयारी करावी
विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वत:तील क्षमता ओळखाव्यात. त्यानंतर ध्येय निश्चित करावे. काही तरी वेगळे करुन दाखवण्याचे ध्येय समोर ठेवून तयारी करावी. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिला पाहिजे. चुकांमधून शिकत गेले पाहिजे. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सोर्सेस लिमिटेड वापरा; मात्र ते योग्य पद्धतीने निवडा. यु ट्युबवर स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे अनेक व्हिडीओज् आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी यु-ट्यूबच गुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चे कन्सेप्ट क्लिअर करुन सातत्यपूर्ण तयारी केल्यास यश निश्चित मिळेल, असे चव्हाण यांनी सांगितले.