ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश
By मारोती जुंबडे | Published: September 4, 2024 07:23 PM2024-09-04T19:23:51+5:302024-09-04T19:24:39+5:30
ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा
परभणी: विद्यापीठाने विकसित प्रक्षेत्रावर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण करून स्वयंचलीत शेती विकसित करावी. तसेच ड्रोनद्वारे फवारणीबाबत चर्चा करून ड्रोन फवारणीसाठी विद्यापीठाने सध्या आकारलेला दर कमी करावा. ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी आयोजित आढावा बैठकीत दिले.
अतिवृष्टीने बाधित पिकांची पहाणी करण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मुंडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भेट दिली. यावेळी विद्यापीठाने अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे रक्षणाकरिता आणि सद्यस्थितीत पीक व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी आमदार राजेश विटेकर, माजी आ. मधुसूदन केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर,कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलसचिव संतोष वेणीकर यांनी विद्यापीठाचा महसूल वाढ होण्याच्या दृष्टीने बीजोत्पादन प्रकल्प, उती संवर्धित केळी आणि उसांच्या रोपांना मागणी असल्याने या प्रकल्पांना मंजूर देण्याची विनंती केली.
यावेळी नियंत्रक प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. आर. डी. क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राजेश कदम, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, लातूर विभागाचे कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ आदींची उपस्थिती होती.