सन्मान, स्वीकार, सामंजस्य त्रिसूत्रीचा वापर करा- आनंद नाडकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:52 AM2019-11-26T00:52:10+5:302019-11-26T00:53:06+5:30
पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी सन्मान, स्वीकार व सामंजस्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ़आनंद नाडकर्णी यांनी केले़
येथील साद मैत्रीची या १९९१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या गु्रपने नाडकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते़ बाल विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या व्याख्यानास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ डॉ़ नाडकर्णी म्हणाले, सुसंवादासाठी दोन्ही घटकांचे वर्तन सामंजस्यपूर्ण असणे गरजेचे आह़े़ परिवारात एखाद्या मुद्यावर मतभेद असू शकतात़ परंतु, व्यक्तींमध्ये मनभेद असता कामा नये, पाल्यांना सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित केले पाहिजे़ मुलांच्या आवडीप्रमाणे कल आणि बुद्धीमत्तेनुसार एखाद्या विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान मिळवून मुलांचे करिअर घडविण्याची मुभा पालकांनी त्यांना द्यावी़ मोबाईलचा वापर शिक्षण आणि ज्ञानरंजनासाठी करण्यावर भर द्यावा़ खूप पैसा कमावणे हे चुकीचे नाही; परंतु, कमावलेल्या पैशाचा सदुपयोग होणे व तो सदुपयोग कसा करायचा? हे कळणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले़ कार्यक्रमास मुख्याध्यापक ए़यू़ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी पालक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न प्रातिनिधीक स्वरुपात भूषण घोडके यांनी मांडल्या़ सम्यक घोडके या विद्यार्थ्याने पाल्यांचे प्रतिनिधीत्व केले़ प्रा़डॉ़ गिरीष कौसडीकर यांनी सूत्रसंचालन केले़ अतुल करमाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला़ अरुण टाक यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी साद मैत्रीची या समूहाच्या सदस्यांनी प्रयत्न केले़