रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:19+5:302021-02-18T04:29:19+5:30
गंगाखेड तालुक्यांतर्गतच्या १०६ गावांत राहणाऱ्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडल्यास त्यांच्यावर गावातच तत्काळ उपचार मिळावे यासाठी तालुक्यातील महातपुरी, धारासुर, ...
गंगाखेड तालुक्यांतर्गतच्या १०६ गावांत राहणाऱ्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडल्यास त्यांच्यावर गावातच तत्काळ उपचार मिळावे यासाठी तालुक्यातील महातपुरी, धारासुर, राणीसावरगाव, पिंपळदरी व कोद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मरडसगाव येथे ही प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी देऊन येथे ही नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. यात कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र व राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधनिर्मात्यांच्या २ जागा रिक्त आहेत. तसेच धारासुर आरोग्य उपकेंद्र १ जागा, पिंपळदरी आरोग्य उपकेंद्र १, कोद्री आरोग्य उपकेंद्र १ तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या घटांग्रा आरोग्य उपकेंद्र १, मरडसगाव आरोग्य उपकेंद्र १ व पडेगाव आरोग्य उपकेंद्रात नियमित कार्यरत असलेल्या अंदाजे ६ परिचारिकांची पदे रिक्त आहे. तर खळी, मुळी व इळेगाव या ३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या तीन परिचारिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य जपणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच उपचाराची गरज निर्माण झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह आरोग्य उपकेंद्रातील नियमित ६ व कंत्राटी ३ अशा एकूण ९ परिचारिकांच्या तसेच २ औषधनिर्मात्यांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात, अशी मागणी तालुकावासीयांतून केली जात आहे.
रात्री अपरात्री गाठावे लागते गंगाखेड शहर
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्याने येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना व गरोदर मातांना ऐनवेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोणी कर्मचारी मिळून येत नाही. यामुळे त्यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागत आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील एखाद्या रुग्णास साधी ताप आली तरी गंगाखेड शहर गाठावे लागत आहे.