जिल्हाभरात ४३४ ज्येष्ठांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:32+5:302021-03-04T04:30:32+5:30
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशभरात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले; परंतु विविध ...
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशभरात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले; परंतु विविध व्याधी असलेल्या व्यक्तींना १ मार्चपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ४३४ ज्येष्ठांना लस दिल्यानंतर मंगळवारीही एवढ्याच व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये २६१ पुरुषांचा, तर १७३ महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सेलू उपजिल्हा रुग्णालयात १२६, महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात ५८, जिल्हा सामान्य रुग्णालयात १०७, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात १९, जिंतूर ग्रामीण रुग्णालयात ५०, पाथरी ग्रामीण रुग्णालयात ८, सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात १० जणांना लस देण्यात आली. पूर्णा ग्रामीण रुग्णालयात ५६ जणांना लस देण्यात आली.
जांब, पिंगळी, मानवत, पालम, देऊळगाव गात, वालूर, रावराजूर, कोद्री, महातपुरी, पिंपळदरी, पाथरगव्हाण, आसेगाव, चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी एकाही व्यक्तीला लस देण्यात आली नाही. लसीकरण मोहिमेत कोविन-२ ॲपमध्ये मंगळवारीही दुपारी १ ते २ च्यादरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे हे ॲप संथ गतीने चालल्याने लसीकरणावर काहीसा परिणाम झाला. ज्येष्ठांना लस देण्याची मोहीम यानंतरही सुरू राहणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.