रिक्त पदांमुळे लसीकरणाला ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:47 AM2020-12-04T04:47:41+5:302020-12-04T04:47:41+5:30
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने दिवसभर जनावरांचे लसीकरण करणे आणि रात्री ...
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने दिवसभर जनावरांचे लसीकरण करणे आणि रात्री टॅगिंग अहवाल करण्याची कसरत या विभागातील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही होत असल्याने पशुपालकांत मात्र चिंतेचे वातावरण आहे.
सेलू तालुक्यात ३८ हजार २३५ बैलवर्गीय आणि ६ हजार ९६८ म्हैसवर्गीय जनावरे आहेत. शेळी वर्गात ८ हजार ९०७ जनावरांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण जनावरांची संख्या ५४ हजार ११० एवढी आहे. या जनारांच्या आरोग्य संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाचे सेलू येथे तालूका लघु पशू चिकित्सालय तर बोरकीनी, चिकलठाणा बु व मोरेगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे. जिल्हा परिषद स्थानिकस्तर अंतर्गत कुपटा, वालूर, गुगळी धामणगाव, डासाळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे.
राज्यस्तरावरील विभागाअंतर्गत बोरकीनी, चिकलठाणा बु, ,सेलू येथे पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. या तिन्ही ठिकाणी मोरेगाव येथील पशुधन पर्यवेक्षक ए.एस. देशमाने यांना अतिरिक्त पदभार दिला आहे. लू येथील तालुका पशू चिकित्सालय येथील सहाय्यक आयुक्त यांचे पद रिक्त असून या पदाचा अतिरिक्त पदभार पशुधन विकास अधिकारी के.पी. भालेराव यांच्याकडे आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद स्थानिकस्तर अंतर्गत कुपटा येथे १ परिचर, १ वर्णोपचारक, डासाळा येथे पशुधन पर्यवेक्षक व परिचरचे पद रिक्त आहे. सध्या तरी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत असून, कामाचा ताण वाढला आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे/. केवळ ११ हजार जनावरांचे लसीकरण...
सेलू तालुक्यात ८ पशुवैद्यकीय दवाखान्यांअंतर्गत लसीकरण व टॅगिंगसाठी ४० हजार ८०० जनावरे आहेत. त्यापैकी ३५ हजार ७०० जनावरांसाठी लाळखुरूकुत लस उपलब्ध झाली होती. १४ ऑक्टोबर ते २ डिसेंबरपर्यंत केवळ ११ हजार ७१ जनावरांचे लसीकरण व टॅगिंग पूर्ण झाले असून वाढीव मुदत मिळालेल्या ३१ डिसेंबरपर्यंत २४ हजार ६२९ लसीकरण व टॅगिंग करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. उपलब्ध मुनुष्यबळावर उद्दिष्टपूर्ती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्राजक्ता कुलकर्णी
प्रभारी तालुका पशुधन विकास अधिकारी, सेलू.
पशुधन विकास अधिकारी पद कागदावरच....
तालुका निर्मितीच्या वेळी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद निर्मिती करणे आवश्यक असताना अद्यापही पद निर्मिती झाली नाही. सध्या कुपटा येथील पशुधन विकास अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.