१३ केंद्रांवर लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:15+5:302021-07-01T04:14:15+5:30
परभणी : शहरातील ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य चार ठिकाणी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस १ जुलै रोजी उपलब्ध राहणार ...
परभणी : शहरातील ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य चार ठिकाणी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस १ जुलै रोजी उपलब्ध राहणार आहे. तर केवळ इनायतनगर केंद्रावर कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. दोन्ही लसींसाठी ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशन तसेच नोंदणी पर्याय उपलब्ध आहे.
शिधापत्रिकाधारकांनी आधार लिंक करावे
परभणी : जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी लाभार्थींनी त्यांचा आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक स्वस्त धान्य दुकानदारांकडे ३१ जुलैपर्यंत जमा करावेत. मोबाइल व आधार क्रमांक लिंक ३१ जुलैपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे.
परभणी तालुक्यात आढळले ९ रुग्ण
परभणी : जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या १९ कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक ९ रुग्ण हे परभणी तालुक्यात आढळून आले. यासह पाथरी तालुक्यात ५, सोनपेठ १, सेलू १, गंगाखेड १ व जालना तसेच माजलगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
स्माइल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कोरोनाच्या काळात अनुसूचित जातीच्या ज्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला, अशा कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी स्माइल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना राबविली जाणार आहे. यासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
शहरात तीन ठिकाणी कोरोना चाचणी
परभणी : शहर महापालिकेच्या वतीने काळी कमान, जिंतूर रोडवरील जांब नाका व शिवाजी चौक येथे बुधवारी कोरोना चाचणी मोहीम राबविण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या तसेच नियम मोडणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. पोलिसांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन सत्रात मोहीम राबविली.