खासगी रुग्णालयात मिळेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:05+5:302021-07-11T04:14:05+5:30
परभणी : जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना शासकीय केंद्रांवर रांग लावून लस घ्यावी लागत ...
परभणी : जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना शासकीय केंद्रांवर रांग लावून लस घ्यावी लागत आहे. या काळात कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात आहे.
शासकीय लसीकरण केंद्रांवर वाढत असलेली नागरिकांची गर्दी लक्षात घेता काही जणांनी गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे देऊनही या ठिकाणी लस उपलब्ध होत नाही. जिल्ह्यात चार खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली होती. मात्र, कालांतराने रुग्णालयांनी स्वतःहून लस खरेदी करावी, असा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होत नाही.
कोरोना संसर्ग टळला असला तरी पुढील लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक लसीकरण केंद्रावर जाताना आवश्यक ती काळजी घेऊनच जात आहेत. गर्दी टाळण्यासाठी ठराविक अंतरही ठेवले जात आहे. सध्या तरी शहरासह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सध्या तरी खासगी रुग्णालयांचा पर्याय उपलब्ध नाही.
काय घेतली जात आहे काळजी
लसीकरणासाठी गर्दी होऊ नये ही बाब लक्षात घेऊन केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.
लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
एकाच वेळी गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जाते.
सकाळी ७ ते १० या वेळेत टोकण दिले जात असून, टोकणवर दिलेल्या वेळेनुसारच संबंधित नागरिकाचे लसीकरण करून घेतले जात आहे.
लसीकरण केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या नागरिकालाच लस दिली जात असल्याने गर्दी कमी होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच मी लस घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण केंद्रातून कोरोना होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला.
ए. एस. जाधव
लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाताना आवश्यक ती सर्व काळजी घेतली. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेतली. लसीकरणानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ केले. त्यानंतर घरी जाऊन पुन्हा हात पाय धुऊनच घरात प्रवेश केला.