Valentine Day : सामाजिक ध्येयातून जुळली मने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:40 PM2019-02-14T13:40:14+5:302019-02-14T13:44:12+5:30
कॉ़ राजन आणि अॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधला आहे.
- प्रसाद आर्वीकर
परभणी : प्रेमाच्या आणा-भाका घेऊन सुखी संसाराचे इमले रचण्याच्या प्रेमकहाण्या नव्या नाहीत; परंतु, या प्रेमापलीकडे जाऊन समाजातील दीन-दलित, पीडितांच्या प्रश्नांवर काम करीत सामाजिक ध्येयातून एकत्र येत येथील कॉ़ राजन आणि अॅड़ माधुरी क्षीरसागर दाम्पत्याने खऱ्या अर्थाने पीडितांच्या प्रश्नांमध्ये जिव्हाळा शोधला
आहे.
माधुरी बापूराव कुलकर्णी या मूळच्या पुणे येथील तर राजन रामचंद्र क्षीरसागर हे सोलापूर जिल्ह्यातील. पुणे येथे सर परशुरामभाऊ महाविद्यालयात १९८६ मध्ये बी.एस्सी.चे शिक्षण घेताना दोघेही वर्गमित्र होते. शिक्षण सुरू असताना राजन क्षीरसागर हे लोकविज्ञान संघटनेत काम करीत होते. वैज्ञानिक प्रचार, प्रसार करणे, तंत्रज्ञानाचा वापर जनतेसाठी व्हावा, विघातक कामासाठी होऊ नये, हा मूळ उद्देश समोर ठेवून ही संघटना काम करीत होती. माधुरी या स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियामध्ये (एसएफआय) काम करायच्या. दोघांवरही डाव्या विचारांचा पगडा असल्याने सोबत काम करण्यास सुरुवात केली आणि यातूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १३ मार्च १९९० रोजी विवाहबद्ध झाले.
पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत असताना राजन यांच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी आली आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी याच जिल्ह्यात भारत ज्ञानविज्ञान समितीच्या माध्यमातून माधुरी क्षीरसागर यांनी कामाला सुरुवात केली़ स्त्री शिक्षण, संपूर्ण साक्षरता अभियान, महिलांचे प्रश्न घेऊन माधुरी यांनी तर राजन क्षीरसागर यांनी शेतकरी, शेतमजूर, हमाल, मापाड्यांच्या प्रश्नांवर कामाला सुरुवात केली़ १५ वर्षांपासून हे दाम्पत्य समाजातील पीडित आणि शोषितांसाठी एकत्र येऊन काम करीत आहे़
मार्ग वेगळे; ध्येय मात्र एक
‘आमच्या दोघांचाही वैचारिक पगडा वेगळा आहे. राजन यांचे विचार राजकीय, तंत्रस्नेही आणि माझे विचार सामाजिक अधिष्ठान असलेले. दोघांचीही काम करण्याची पद्धत वेगळी असली तरी समाजातील पीडितांना न्याय देणे या ध्येयातूनच आम्ही काम करतो. त्यामुळे काम करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ध्येय मात्र एक आहे’, माधुरी क्षीरसागर सांगत होत्या.