वैधमापन निरीक्षकाने पेट्रोल पंपाच्या स्टॅम्पिंगसाठी स्वीकारली तीस हजारांची लाच
By राजन मगरुळकर | Published: July 22, 2023 02:15 PM2023-07-22T14:15:58+5:302023-07-22T14:16:47+5:30
तक्रारदाराच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद होता.
परभणी : पेट्रोल पंपाची दुरुस्ती केल्यानंतर वैधमापन शास्त्र विभागाकडून स्टॅम्पिंग करून घेण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराकडून निरीक्षकाने ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. एसीबीने लाच मागणी पडताळणी केल्यानंतर सापळा कारवाई केली. त्यात आरोपी लोकसेवकाने पंचासमक्ष तीस हजारांची लाच स्वीकारली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी संबंधितास ताब्यात घेत गुन्हा नोंद प्रक्रिया नानलपेठ ठाण्यात सुरू होती.
अरविंद नामदेवराव रोडेवाडकर असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे तो बंद होता. सदर पंपाची दुरुस्ती केल्यानंतर निरीक्षक वैधमापन शास्त्र विभाग यांच्याकडून स्टॅम्पिंग करून घेतल्याशिवाय पेट्रोल, डिझेल विक्री करता येत नाही. स्टॅम्पिंगची शासकीय फीस ११ हजार तक्रारदाराने सोमवारी ऑनलाइन चलनाद्वारे भरली. त्यानंतर या कार्यालयात स्टॅम्पिंगसाठी अर्ज दाखल केला. तक्रारदार हे आरोपी लोकसेवकांना सदर कामासाठी भेटले असता पेट्रोल पंपाची स्टॅम्पिंग करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे ४० हजारांच्या लाचेची मागणी केली. यानंतर पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांना तडजोडीअंती तीस हजार लागलीच व स्टॅम्पिंग केल्यानंतर पाच हजार अशी लाच मागितली.
कारवाईत पंचासमक्ष तीस हजारांची लाच आरोपी लोकसेवकाने स्वीकारली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, चंद्रशेखर निलपत्रेवार, अतुल कदम, मो.जिब्राईल, शेख मुक्तार, कल्याण नागरगोजे, कदम यांनी केली.