बदल्यांच्या अनियमिततेचा परभणी जिल्हा परिषदेत सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:35 AM2018-02-06T00:35:38+5:302018-02-06T11:36:23+5:30
जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचा-यांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचा-यांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिका-यांनी लावल्याची आणखी एक बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे जि़प़च्या काही कर्मचा-यांनी ‘लोकमत’कडेच या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचाºयांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचाºयांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिकाºयांनी लावल्याची आणखी एक बाब समोर आली आहे़ विशेष म्हणजे जि़प़च्या काही कर्मचाºयांनी ‘लोकमत’कडेच या संदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली आहे़
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जून २०१७ मध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या़ खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर तातडीने एकाच जागेचा लळा लागलेल्या या कर्मचाºयांनी मर्जीतील अधिकाºयांना गाठून परस्पर नियुक्त्या केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते़ ‘लोकमत’च्या या वृत्तानंतर जवळपास महिनाभरापासून याबाबत चर्चा होत नसल्याने आनंदात असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली़ दुसरीकडे जि़प़तील काही प्रामाणिक कर्मचाºयांनी त्यांच्या मनातील विषय ‘लोकमत’ने मांडल्याने त्यांनी ‘लोकमत’चे जाहीर आभार मानणारे पत्र कार्यालयात आणून दिले़ शिवाय आणखी कोण कोणत्या विभागातील कर्मचाºयांच्या परस्पर बदल्या रद्द करून ते कर्मचारी ‘क्रीम’ जागेवर आले, याबाबतची माहिती ‘लोकमत’कडे दिली़ त्यामध्ये अर्थ, बांधकाम, शिक्षण, मग्रारोहयो विभागातील प्रमुख कर्मचाºयांची नावे आहेत़
एका कर्मचाºयाने तर या संदर्भात जि़प़च्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांच्या स्वाक्षरीने १६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाची प्रतच ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली़ त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक एस़व्ही़ जोशी यांच्याकडील भांडार विभागाचा पदभार मग्रारोहयो विभागातील एस़जे़ बेग यांना देण्यासंदर्भातील तर बेग यांच्याकडील मग्रारोहयोचा पदभार जोशी यांच्याकडे सोपविण्यासंदर्भातील आदेश आहेत़ त्यामुळे जि़प़चे अवेळी केलेल्या बदल्यांचे बिंग फुटले आहे़
करडखेलकर यांच्या बोलण्यात आली तफावत
१ फेब्रुवारी रोजी कर्मचाºयांच्या बदल्यांच्या अनुषंगाने प्रतिक्रियेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी करडखेलकर यांची सदरील प्रतिनिधीने प्रतिक्रिया घेतली असता त्यावेळी त्यांनी अधिकृतरित्या कोणत्याही कर्मचाºयांच्या सद्यस्थितीत बदल्या केल्या नसल्याचे सांगितले होते़ कामाची गरज म्हणून कोणाला बोलावून घेतले असेल तर माहीत नाही, असे ते म्हणाले होते़ परंतु, कनिष्ठ सहाय्यक जोशी व बेग यांच्या बदलीसंदर्भात त्यांना सोमवारी पुन्हा विचारणा केली असता पूर्वी बदल्या झाल्या नाहीत, अशा त्यांच्या भूमिकेपासून घुमजाव करीत त्यांनी पंचायतराज समितीच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर या तात्पुरत्या बदल्यांचे आदेश काढले होते, असे सांगितले़ पंचायतराज समितीचा दौरा होवून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ मग या बदल्या आता रद्द का केल्या नाहीत? यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही़ त्यामुळे करडखेलकर यांच्या दोन दिवसांमधील बोलण्यात तफावत आल्याचे दिसून येत आहे़