विविध मागण्यांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:08+5:302021-01-25T04:18:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्हा परिषदेतील पदवीधर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, यासाठी पदवीधर कर्मचारी संघटनेने दिनांक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेतील पदवीधर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, यासाठी पदवीधर कर्मचारी संघटनेने दिनांक २७ ते २९ जानेवारी याकाळात राज्यव्यापी संप पुकारला असून, जिल्ह्यातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.
जिल्हा परिषद सेवेतील वर्ग ४ कर्मचाऱ्यांना, अनुकंपामधून सेवेत आलेल्या व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार जिल्हा परिषदेतील वर्ग ३ च्या पदांमध्ये १० टक्केप्रमाणे पदोन्नती द्यावी, सरळ सेवेतून आलेल्या परिचर कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती द्यावी, परिचर वर्ग ४मधून पदोन्नतीने लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा कोटा २५ टक्क्यांवरुन ५० टक्के करावा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने न भरता सरळ सेवेने भराव्यात, वैद्यकीय कारणास्वत अपात्र ठरलेले कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या एका पाल्याला सेवेत सामावून घ्यावे, पहिल्या कालबद्ध पदोन्नतीमध्ये कनिष्ठ सहाय्यकांची वेतनश्रेणी द्यावी आदी मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी संघटनेच्यावतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र, मागण्या मंजूर झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेने २७ जानेवारीपासून लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यानुसार २७ जानेवारी रोजी काळ्या फिती लावून काम करणे, २८ जानेवारी रोजी मधल्या सुटीत निदर्शने आणि २९ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस लाक्षणिक संप केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जिल्हा परिषद पदवीधर संघटनेचे अध्यक्ष अतुल मुळे, विष्णू घुगे, पी. एन. गोरले, राहुल धोटे, गौतम सरकार, संजय वाघमारे, प्रीती दिवाण तसेच संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी गजानन इंगळे, सचिन लांडगे आदींनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.