परभणी शहरात वाढली विविध फळांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:06 AM2019-04-25T00:06:17+5:302019-04-25T00:06:40+5:30
येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रबी हंगाम तोट्यात गेला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या आहेत़ टरबूज, खरबूज आणि अंजीर ही फळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करीत परभणीच्याबाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीला आली आहेत़ उन्हापासून बचाव करण्यासाठी फळांचे सेवन केले जाते़ त्यामुळे या फळांना मागणीही वाढली आहे़ सद्यस्थितीला परभणी बाजारपेठेत दररोज साडेतीन क्विंटल द्राक्ष्यांची आवक होत आहे़ बार्शी, नागस या भागातून माणिक चमन, सुपर सोना, कॅप्सूल या वाणांचे द्राक्ष बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत़ तर जिल्ह्यात उत्पादित झालेले खरबूज सध्या स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे़
दररोज ५ ते १० क्विंटल टरबुजांची विक्री होते़ खरबुजांमध्ये केसर आणि चक्री असे दोन प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत़ तालुक्यातील सिंगणापूर, पूर्णा तालुक्यात अंजीराचे उत्पादन अधिक असून, हे अंजीर बाजारपेठेत उपलब्ध आहेत़ साधारणत: दोन क्विंटल अंजीरची दररोज विक्री होते़ त्याच प्रमाणे टरबुजांनाही मागणी आहे़ किरण, शुगरकिंग या वाणाच्या टरबूजांना ग्राहकांची मागणी आहे़
फळांचे भाव प्रतिकिलो
द्राक्ष ७० रुपये
खरबूज २० रुपये
अंजीर ६० रुपये
डाळींब ६० रुपये
सफरचंद १४० रुपये
टरबूज १५ रुपये
आंबा (दशहरी) १०० रुपये
आंबा (बादाम) ८० रुपये
मोसंबी, डाळिंबाची आवक घटली
४काही फळांचा बहार संपत आल्याने आवक घटली आहे़ त्यामध्ये मोसंबी, डाळींब आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे़ ही फळे पर जिल्ह्यातून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी येतात़ मात्र आवक घटल्याने या फळांचे भाव वधारले आहेत़
आंबे बाजारपेठेत दाखल
४उन्हाळ्यात आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते़ परभणीकरांची आंब्याची प्रतीक्षा संपली आहे. गावरान आंबे अजूनही बाजारपेठेत दाखल झाले नसले तरी दशहरी आणि बादाम या जातीचे आंबे सध्या बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत़
मागील काही महिन्यांपासून फळांची आवक वाढली आहे़ विविध प्रकारचे फळे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, ग्राहकांचीही या फळांना मागणी चांगली आहे़
-शेख यासीन शेख सुभान, विक्रेता