परभणी जिल्ह्यातील तेरा लाख मतदारांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:25 AM2020-02-18T00:25:46+5:302020-02-18T00:26:29+5:30
जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी तब्बल १३ लाख १९ हजार २९७ मतदारांची पडताळणी करुन जिल्ह्याने राज्याच्या पडताळणीच्या कामात ११ वा क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे सुमारे ९४ टक्के मतदार यादीचे पुनरिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ही अर्हता मानून मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित केला आहे़ मतदार पडताळणी कार्यक्रमांंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनरिक्षण केले जात आहे़ ११ नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम १५ मे २०२० पर्यंत चालणार आहे़ या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बीएलओंमार्फत मतदारांपर्यंत पोहचून त्यांची पडताळणी करण्यात आली़ २९ फेब्रुवारीपर्यंत पडताळणीचा हा कार्यक्रम चालणार असून, त्यानंतर १३ मार्च रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ जिल्ह्यात १५०४ मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रनिहाय बीएलओंच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यात आली़ आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील १३ लाख ९९ हजार ३५० मतदारांपैकी १३ लाख १९ हजार २९७ मतदारांपर्यंत निवडणूक विभागाचे कर्मचारी पोहचले असून, या माध्यमातून मतदारांच्या नावात बदल करणे, मयत मतदार, स्थलांतरित मतदार, मतदान केंद्राचा बदल आदी पडताळणी करून मतदारांच्या सोयीनुसार मतदार यादीत बदल करण्यात आले आहेत़ या कामात राज्याच्या यादीमध्ये परभणी जिल्ह्याने ११ वे स्थान मिळविले असून, ९४़२८ टक्के काम जिल्ह्यामध्ये झाले आहे़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अव्वल कारकून नानासाहेब भेंडेकर यांनी वेळोवेळी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे निवडणूक विभागाने पडताळणी कार्यक्रमात ९४ टक्के काम पूर्ण केले आहे़ २९ फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून, सर्व मतदारांपर्यंत कर्मचारी पोहचतील आणि मतदार यादीतील नावांची पडताळणी पूर्ण केली जाईल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे़
२२ हजार ६७१ मतदारांच्या नावांची दुरुस्ती
४या कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या अर्जानुसार २२ हजार ६७१ मतदारांच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ जिंतूर मतदार संघात १० हजार ३५१, परभणी २ हजार ६५३, गंगाखेड ७ हजार २६४ आणि पाथरी मतदार संघात २ हजार ४०३ मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे ९६३ मतदारांचे छायाचित्र दुरुस्त करण्यात आले़ तसेच ३० मतदारांचे नावे स्थलांतरित करण्यात आली़ ६ मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत़
२४ हजार मतदारांच्या वयात दुरुस्ती
४जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ हजार १९८ मतदारांच्या वयामध्ये दुरुस्ती करण्याचे अर्ज या कार्यक्रमांतर्गत प्राप्त झाले होते़
४त्यानुसार वयामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़ जिंतूर विधानसभा मतदार संघात १५ हजार ६८३, परभणी १ हजार ८५८, गंगाखेड ३ हजार ८४६ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात २ हजार ८११ मतदारांच्या वयामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे़