Video : आरपीएफ जवान ठरला देवदूत, महिलेचे वाचविले प्राण
By राजन मगरुळकर | Published: October 1, 2023 02:37 PM2023-10-01T14:37:32+5:302023-10-01T14:40:45+5:30
परभणी रेल्वे स्थानकावरील प्रकार
परभणी : नगरसोल येथून काचीगुडाला जाणारी एक्सप्रेस परभणी स्थानकातून रवाना होत असताना चालत्या रेल्वेमध्ये डब्यात चढताना अचानक महिलेचा हात निसटला. अन रेल्वे सुरू असताना महिला प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या लगत कोसळल्या. हा प्रकार स्थानकात गस्तीवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाला दिसला. त्यांनी व अन्य एका प्रवासाने तत्काळ महिलेला बाजूला काढले. आरपीएफ जवानाच्या या प्रयत्नामुळे पुढील अनर्थ टळला आहे. हा सर्व प्रकार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडला आहे.
रेल्वे क्रमांक (१७६६२) नगरसोल येथून काचीगुडाला जाणारी रेल्वे नेहमीप्रमाणे परभणी स्थानकावर शनिवारी दुपारी आली. यानंतर काही वेळ नियोजित थांब्याप्रमाणे रेल्वे थांबली. त्यानंतर नांदेडकडे जाण्यासाठी रेल्वे निघाली असता रेल्वेने गती घेतली असताना एक महिला अन्य एका प्रवासी सोबत या रेल्वेमध्ये नांदेडला जाण्यासाठी डब्ब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होती. अचानक रेल्वेने वेग घेतला होता. यादरम्यान नांदेडला जाण्यासाठी निघालेल्या महिलेने एका डब्याचा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने सदरील महिला खाली कोसळल्या. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर परिसरातच गस्तीवर असलेले आरपीएफ परभणीचे जवान उगेंद्र मीना यांनी हा प्रकार पाहताच धाव घेऊन सदरील महिलेला तेथून बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
Video : आरपीएफ जवान ठरला देवदूत, महिलेचे वाचविले प्राण.#railwaypic.twitter.com/oXA8NapKvS
— Lokmat (@lokmat) October 1, 2023
मीना यांचा केला सत्कार
यापूर्वी सुद्धा अशा घटनांमध्ये आरपीएफ जवानांनी चांगली सेवा बजावली आहे. दरम्यान, काही वेळ रेल्वे घटनेमुळे थांबली होती. त्यानंतर पुन्हा सदरील महिलेला सुखरूपपणे रेल्वे डब्यात बसवून देण्यात आले व रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली. उगेंद्र मीना यांनी केलेल्या कार्याचा आरपीएफ पोलीस निरीक्षक एस.बी.कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.