Video: मुलगा पेट्रोलसाठी रांगेत, वडील शेजारी; तरीही चोरट्याने डिक्कीतील १ लाख पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:03 PM2023-01-31T20:03:08+5:302023-01-31T20:03:57+5:30
बँकेपासून पाठलाग करत चोरट्यांनी पेट्रोल पंप गाठला; गर्दीचा फायदा घेत डिक्कीतून अलगद रक्कम पळवली
मानवत (परभणी) : पेट्रोलसाठी रांगेत असताना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाखांची रोकड चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पळवल्याची घटना सोमवारी ( दि. ३० ) दुपारी घडली. विशेष म्हणजे, मुलगा दुचाकीवर असताना वडील बाजूलाच उभे होते. मात्र, चोरट्याने धाडस करत डिक्कीतील रक्कम अलगद लंपास केली.
मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील भास्कर लक्ष्मणराव कदम व त्यांचा मुलगा गजानन हे दोघे सोमवारी दुपारी आठवडे बाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कामानिमित्त आले होते. बँकेतून १ लाख रुपये काढल्यानंतर दोघेही परत निघाले. यावेळी त्यांनी रोख रक्कम एका पिशवीत ठेवत दुचाकीच्या ( एम एच 22 ए सी 6019) डिक्कीत ठेवली.
परभणी: चोरट्याची कमाल, पेट्रोल पंपावर गर्दीचा फायदा घेत दुचाकीच्या डिक्कीतील १ लाख पळवले,मानवत येथील घटना pic.twitter.com/ul0QEaphoQ
— Lokmat (@lokmat) January 31, 2023
दरम्यान, दुपारी 12:45 वाजता शहरातील कत्रुवार पेट्रोल पंपावर गजानन पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा राहिला. तर वडील भास्करराव गाडीवरून उतरून बाजूला उभे राहिले. याच वेळी पाठलाग करत असलेला एक तरुण गजाननच्या गाडीमागे येऊन थांबला. काहीवेळ नजर ठेवत त्याने डिक्कीचे दोन्ही हुक शिताफीने उघडले. त्यानंतर गर्दी वाढत गेल्याचा फायदा घेत त्याने डिक्कीतून १ लाख रुपये अलगद लंपास केले.
सीसीटीव्हीत घटना कैद
ही चोरीची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका दुचाकीवरील दोघे कदम पितापुत्राच्या मागे पेट्रोल पंपावर आले. त्यानतंर एकाने रस्त्यावर गाडी लावली. तर दुसरा चोरीसाठी मध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आज भास्कर कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नारायण सोळंके हे करीत आहेत.