Video: थरारक! पाथरीत मध्यरात्री कारने घेतला अचानक पेट, काहीवेळातच झाली भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:40 PM2024-05-10T14:40:27+5:302024-05-10T14:41:34+5:30
पाथरीमध्ये १२ तासांत दोन आगीच्या घटना, एकाचा ऊस तर एकाची कार भस्मसात
- विठ्ठल भिसे
पाथरी: पाथरी - सेलू रस्त्यावर खेडूळा पाटीजवळ उभ्या असणाऱ्या एका कारला आज पहाटे १२. १५ वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाने तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती.
तालुक्यातील खेडुळा पाटी जवळ १० मे रोजी पहाटे १२.१५ च्या सुमारास पाथरी येथील भानुदास दिवाण यांच्या मालकीची कार विटभट्टी जवळ उभी होती. यावेळी या कारने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती पाथरी अग्निशमन दलाला देण्यात आली. तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत कारच्या इंधन टाकीत स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.
मध्यरात्री अचानक कारने घेतला पेट; आगीत कार जळून खाक, पाथरी येथील घटना #parabhani#CrimeNewspic.twitter.com/2OMe2LpRdC
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 10, 2024
१२ तासांत दोन आगीच्या घटना
दरम्यान, याच परिसरात १२ तासांपूर्वी गुरुवार ९ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास विशाल पामे यांच्या शेतातील खोडवा उसात आग लागली होती. याही ठिकाणी पाथरी न .पा.च्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यावेळी सदरील शेतऱ्याचा ऊस जळून आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन्ही आगीच्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी पाथरी न.पा च्या अग्निशामक दलाच्या शारेफ खान , खुर्रम खान, शेख शेरु , बळीराम गवळे यांनी परिश्रम घेतले.