बाप्पांच्या आगमनाची जिल्ह्यात जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:03+5:302021-09-10T04:25:03+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी मिळाली नसली तरी गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. शहरातील बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी ...
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी मिळाली नसली तरी गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. शहरातील बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गुरुवारी मोठी गर्दी झाली होती.
ऊर्जेचे प्रतीक आणि संकटमोचक म्हणून श्री गणरायाची आराधना केली जाते. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असले तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मात्र कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून, या नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. येथील गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक या भागात लहान आकाराच्या आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. गणेशमूर्तींसह पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य विक्रीच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसून आली.