सही, शिक्का देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली दहा हजार लाच
By राजन मगरुळकर | Published: June 5, 2024 07:23 PM2024-06-05T19:23:08+5:302024-06-05T19:24:27+5:30
परभणी एसीबी पथकाची कारवाई : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू
परभणी : तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी लोकसेवक ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या धनादेशावर धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी आरटीजीएस फॉर्मवर सही व शिक्का देण्यासाठी लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाई दरम्यान बुधवारी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपयाची रक्कम लाच म्हणून स्वीकारली. त्यामध्ये आरोपी लोकसेवक यास लाचेचा रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मधुकर बाबुराव गोरे ग्रामविकास अधिकारी (वर्ग तीन) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी मानवत तालुक्यातील मौजे पोहंडूळ येथे डीपीसीच्या निधीमधून मंजूर झालेल्या रकमेतून तेथील नाले व सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम केले होते. सहा मे रोजी तक्रारदार यांनी केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांची भेट घेऊन धनादेश घेतला. त्यानंतर सदर धनादेश तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीजीएस फॉर्मवर आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्याने सदरची सही व शिक्का देण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांना २० हजार रुपये लाच मागितली.
अखेर एसीबी कार्यालयात तक्रार
सदर लाचेची रक्कम न दिल्यास सही व शिक्का देणार नाही, या भीतीने तक्रारदार यांनी त्यांच्याकडे असलेले चार हजार रुपये गोरे यांना तत्काळ दिले. त्यानंतर उर्वरित १६ हजार रुपये सही व शिक्का घ्यायचे वेळी आणून देण्यास सांगितले. सदर रक्कम ही लाच असल्याने व तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मे रोजी एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
अखेर सापळा कारवाईत घेतली रक्कम
पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान १३ मे रोजी तक्रारदार यांना मिळालेल्या धनादेश त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक अर्जावर आरोपी लोकसेवक मधुकर गोरे यांनी सही, शिक्का देण्यासाठी तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून बुधवारी पंचासमक्ष केलेल्या सापळा कारवाईमध्ये आरोपी लोकसेवक गोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार लाच रक्कम स्वीकारली. यानंतर त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मानवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे व पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे करीत आहेत.