गावपुढारी पुन्हा निवडणुकीसाठी बाशिंग बांधून; निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागले वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 05:50 PM2020-10-27T17:50:46+5:302020-10-27T17:54:12+5:30
निवडणुकीची प्रक्रिया आणि पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.
मानवत : प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता द्यावी तसेच अंतिम प्रभाग रचना २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मानवत तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम होणार आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल पुन्हा वाजणार असल्याने गाव पुढाऱ्यांना या निवडणुकीचे वेध लागले आहे.
कोरोनामुळे निवडणूक आयोगाने १७ मार्च रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे मानवत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ४१ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. आता मात्र निवडणुकीची प्रक्रिया आणि पूर्वतयारी प्रशासनाकडून सुरु होणार असल्याने गावपातळीवर निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.
एकंदर निवडणूक विभागाच्या आदेशामुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आला आहे. २ ग्रामपंचायतचा कार्यकाळ डिसंबरमध्ये संपणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा घेऊन प्रभाग रचना व वाॅर्ड निहाय आरक्षण काढण्यात आले आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकतीचीही सुनावणी झाली आहे. त्यानतंर हे प्रस्ताव मान्यतेसाठी मार्चमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदारनकुल वाघुंडे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायती
तालुक्यातील- ईटाळी, लोहरा, गोगलगाव, आंबेगाव, सोमठाणा, आटोळा , राजुरा, नरळद, मंगरूळ पा.प, टाकळी निलवर्ण, सावंगी मगर, नागरजवळा, बोंदरवाडी ,मांडेवडगाव, पाळोदी, सावरगाव खुर्द, पिंपळा, सावळी, हात्तलवाडी, ताडबोरगाव, उक्कलगाव, केकरजवळा, वझुर खुर्द , किन्होळा बुद्रुक, खडकवाडी, जंगमवाडी, भोसा, रूढी, करंजी, खरबा, रामपुरी बु, मंगरूळ बु . साखरेवाडी, शेवडी जहांगीर, दुधनगाव, कोथळा, हटकरवाडी, पार्डी टाकळी, हमदापूर, थार, वांगी, कुंभारी, पोहंडूळ, सारंगापूर, रामेटाकळी या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे. कोल्हा, मानवत रोड या दोन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे.