अडीचशेच्यावर ग्रामस्थांनी सोडले गाव; रोजगाराअभावी गावात उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:51 AM2019-05-14T11:51:32+5:302019-05-14T11:59:28+5:30
ग्रामस्थांची कामासाठी भटकंती
- अन्वर लिंबेकर
खोकलेवाडी (जि. परभणी) : दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका खोकलेवाडी या गावाला बसला असून गावात काम मिळत नसल्याने अडीचशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी गाव सोडले आहे. साधारणत: १२०० मतदार असलेल्या या गावातील बहुतांश ग्रामस्थ बाहेरगावी कामाच्या शोधार्थ गेल्याने अनेक घरांना कुलूप लागले आहे. सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन दी स्पॉट रिपोर्ट’ मध्ये ही परिस्थिती दिसून आली.
संपूर्ण गंगाखेड तालुकाच दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत आहे. पाणी आणि चारा टंचाई पाठोपाठ मजुरांचे स्थलांतर हा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या खोकलेवाडी या गावची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी थेट गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली तेव्हा दुष्काळाची दाहकता दिसून आली. साधारणत: २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात १२०० मतदार आहेत. तर २०० च्या आसपास कुटुंब संख्या आहे. ८०० मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली आहे. सध्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप आटले असून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणीही तळाला गेले आहे. गावात पिण्यासाठीच पाणी मिळत नसून शेतीचा तर प्रश्नच येत नाही. परिणामी शेतातील कामेही ठप्प आहेत.
गावात आणि परिसरात कामेच नसल्याने सुमारे अडीचशेहून अधिक मजुरांनी गाव सोडले असून त्यांनी पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, गंगाखेड शहर आदी ठिकाणी स्थलांतर केल्याचे समोर आले. काही मजुरांच्या घराला चक्क कुलूप लागले असून त्यांचे कुटुंबासह स्थलांतर झाल्याचे गावकºयांनी सांगितले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या या गावात शेतीची कामे शिल्लक नाहीत. काही छोटेमोठे व्यवसाय चालतात. मात्र दुष्काळाने हे व्यवसायही डबघाईला आले आहेत. त्यामुळे रोजची गुजरान करण्यासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय नसल्याने या गावातून सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी मात्र ठोस पाऊले उचलली जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
गावात फक्त वृद्ध, मुले
खोकलेवाडी गावाला सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट दिली त्यावेळेस गावातील तरुण व कर्ते व्यक्ती रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र गेल्याचे दिसून आले. गावामध्ये महिला, वृद्ध व लहान मुलेच मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. काही तरुण गंगाखेड येथे दररोज रोजगारासाठी ये-जा करतात. अशातच हातालाही काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव ओसाड पडले आहे. तशी प्रतिक्रिया गावातील पद्ममीनबाई व्यंकटी राजपुंगे, गंगाधर बाबुराव धोंडकर, पार्वतीबाई भानूदास सावंत यांनी दिली.