परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात रेशनसाठी लाभार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:20 PM2018-10-01T14:20:52+5:302018-10-01T14:27:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
परभणी- स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळत नसल्याने तालुक्यातील पेडगाव येथील लाभार्थ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून अर्धातास ठिय्या मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पेडगाव येथील रेशन दुकानदार जुलै महिन्यापासून रेशनचे धान्य देत नाही. आॅनलाईन कार्ड नोंदणी झाली नसल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी आम्ही तहसील कार्यालयात अर्ज दिला. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी तालुका पुरवठा अधिकारी पेडगाव येथे आले. त्यांनी ज्यांच्या पावत्या निघेल त्यांना रेशन द्या, असे सांगितले. ६० टक्के लाभार्थ्यांच्या पावत्या निघाल्या; परंतु, दुकानदाराकडे रॉकेल आणि तूरदाळ नसल्याने ३० टक्के लाभार्थ्याना धान्य मिळाले नाही. उर्वरित ४० टक्के लाभार्थ्यांचे आधारलिंक नसल्याने रेशन मिळणार नसल्याने दुकानदार व पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रशासकीय कारवाईमुळे लाभार्थी रेशनपासून वंचित राहत असून लाभार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन पर्यायी व्यवस्था करावी, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची भेट घेतली. एक- दोन दिवसात प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिल्यानंतर लाभार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.