परभणी शहरातील घरकुल लाभार्थ्यांना मिळेना वाळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:12 AM2019-06-16T00:12:51+5:302019-06-16T00:12:57+5:30
शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.
परभणी शहरात विविध योजनेंतर्गत १६२५ घरकुल बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळूचे चार धक्के राखीव ठेवले होते; परंतु, त्यापैकी केवळ एका वाळू धक्क्यावरुन लाभार्थ्यांना वाळू दिली जात आहे; परंतु, याच वाळू धक्क्यावर इतरही वाहनधारक वाळूचा उपसा करतात. शहरी तसेच ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एकच वाळू धक्का उपलब्ध करुन दिल्याने या ठिकाणी वाळू नेण्यासाठी गर्दी होत आहे. परिणामी अनेक लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध होत नाही. दरम्यान, या प्रश्नावर नगरसेवक सुशील कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवलेले चारही धक्के सुरु करावेत व या ठिकाणाहून लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. एकच वाळू धक्का खुला असल्याने अनेक वेळा लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. त्यामुळे वाहनांच्या किरायाचा भूर्दंड लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे, असेही जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना दिलेल्या निवेदनावर बबनराव सूर्यवंशी, माधवराव निसरगण, ज्ञानोबा मस्के, जालिंदर गाडे, जिजाबाई खंदारे, चंद्रकांत वाव्हळे, विमलबाई वाव्हळे, गयाबाई गाडे, कमलबाई गाडे, रमाबाई जाधव, माणिक कांबळे, लक्ष्मीबाई मस्के, सुनील काकडे, संदीप पंडित, पंडित निकाळजे आदी लाभार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.