चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांची तिघांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू
By राजन मगरुळकर | Published: May 27, 2023 02:43 PM2023-05-27T14:43:17+5:302023-05-27T14:43:22+5:30
परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील घटना, दोघे जण गंभीर जखमी
- गजानन नाईकवाडे
ताडकळस (जि.परभणी) : चोरीच्या उद्देशाने गावात आल्याच्या संशयावरून तिघांना जबर मारहाण करण्यात आली. यात एक जणाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास परभणी तालुक्यातील उखळद गावात घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, परभणी तालुक्यातील बलसा खुर्द येथील तिघे जण उखळद येथे गेले असता सदरील युवक हे चोरीच्या उद्देशाने आल्याचा संशय धरून तिघांना काही लोकांनी जबर मारहाण केली. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना तसेच मयतास परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि.कपिल शेळके आदींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी दूपारपर्यंत सुरू होती, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.