कोरोना नियमांचे उल्लंघन; ८९ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:08+5:302021-06-20T04:14:08+5:30
जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक नियम लागू केले. मात्र, ...
जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक नियम लागू केले. मात्र, अनेक नागरिक हे नियम डावलून रस्त्यांवर फिरत होते. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली. अशा वेळी पोलिसांनी जिल्हाभरात कारवाया केल्या. पोलिसांच्या दंडात्मक कारवायांमुळे नागरिकांत धास्ती निर्माण होऊन नियमांचे पालन होऊ लागले.
१९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. त्यात विनामास्क फिरणे, अत्यावश्यक सेवेत मोडत नसतानादेखील दुकान सुरू ठेवणे, मोटार वाहन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करीत नागरिक रस्त्यावर फिरत होते. अशा नागरिकांवर पोलिसांनी या काळात कारवाया केल्या आहेत.
जानेवारी २०२० ते ११ जूनपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या २० हजार २७१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत ४० लाख ७७ हजार ३५० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या ४९९ नागरिकांकडून ९६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ६४९ वाहन चालकांकडून ३४ लाख २६ हजार २३३ रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे.
अकराशे दुचाकी वाहने जप्त
कोरोनासंसर्ग असतानाही विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. सहा महिन्यांत १ हजार १५६ दुचाकी वाहने जप्त केली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २९८ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहर वाहतूक शाखेनेही केल्या कारवाया
कोरोनाकाळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेची होती. शहरातील शिवाजी चौक, बसस्थानक, गांधी पार्क, स्टेशन रोड या ठिकाणी वाहतूक कर्मचाऱ्यांचे फिक्स पॉइंट लावून पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. शहर वाहतूक शाखेनेही मागील वर्षी कोरोनाकाळात कारवाई करीत मागील वर्षभरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.