विष्णुपुरी धरणात ९१ टक्के जलसाठा, तर येलदरी, सिद्धेश्वर ३१ टक्क्यांवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 19:59 IST2024-08-03T19:57:07+5:302024-08-03T19:59:08+5:30
परभणी, हिंगोलीत दमदार पावसाची गरज

विष्णुपुरी धरणात ९१ टक्के जलसाठा, तर येलदरी, सिद्धेश्वर ३१ टक्क्यांवरच
हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात ९१.३५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी आणि सिद्धेश्वर या प्रकल्पांमध्ये मात्र अवघा ३१ टक्के उपयुक्त पाण्यासाठी झाला आहे. त्यामुळे हिंगोलीसह परभणी जिल्ह्यातही दमदार पावसाची गरज आहे.
आठवडाभरापासून पावसाला प्रारंभ झाला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असला तरी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मात्र पुरेशी वाढ झाली नाही. नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पात ९१.३५ टक्के पाणीसाठा झाला असल्याने ही समाधानाची बाब असली तरी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ३१.६८ टक्के आणि सिद्धेश्वर प्रकल्पात ३१.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्याची तहान भागवणारा प्रकल्प अशी येलदरी प्रकल्पाची ओळख आहे. या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा अद्याप समाधानकारक नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होण्याची अपेक्षा, अशा दोन्ही जिल्ह्यातील नागरिक बाळगून आहेत.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा
नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५५.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात ३१ प्रकल्प असून त्यात ३१.७८ टक्के पाणीसाठा झाला आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये ७ प्रकल्प असून त्यामध्ये ४७.३८ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती या मंडळांनी दिली.
इसापुरमध्ये ४६ टक्के साठा
यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातील पाण्याचा लाभा नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होतो. १२७९ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये ४४४.०६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्याची टक्केवारी ४६.०६ टक्के एवढी आहे.
कोणत्या प्रकल्पात किती टक्के साठा
मानार : ५५
विष्णुपुरी : ९१.३५
येलदरी : ३१.६८
सिद्धेश्वर : ३१.३६
इसापूर : ४६.०६