सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा
By ज्ञानेश्वर भाले | Published: September 5, 2022 05:09 PM2022-09-05T17:09:26+5:302022-09-05T17:10:04+5:30
खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली.
परभणी : मानवत शहरात गणेशोत्सवातून सर्वधर्म समभाव तथा समाजातील एकोपा जपण्याचा उद्देशाने ड्रायव्हर गणेश मंडळ स्थापनेपासूनच सामाजिक सलोखा जपत आहे. मंडळाच्या स्थापनेपासून सर्व जाती धर्मांतील लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा मुस्लीम बांधवांवर देऊन खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असा गणेशोत्सव ड्रायव्हर गणेश मंडळ ४० वर्षांपासून साजरा करत आहे.
शहरातील खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली. हातावर पोट भरणाऱ्या व जेमतेम शिक्षण असणाऱ्या या वाहनचालकांनी सामाजिक एकोपा जपण्याचा वसा घेतला. दरवर्षी गणेश उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात येते. यात दोनशे सदस्य असून सर्व एकमताने निर्णयाला पाठिंबा देतात. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून दरवर्षी ड्रायव्हर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लीम समाजातील सदस्यांना दिला जातो. तर उपाध्यक्ष पदाचा मान बौद्ध बांधवाला दिला जातो. सदस्य मोईन अन्सारी व सुधीर भदर्गे यांच्यापासून सुरू झालेला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा वारसा आजही अविरत सुरूच आहे.
दरवर्षी समितीतील सदस्य निवडताना विविध जाती धर्मांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी मंडळ पुढाकार घेते. मागील ४० वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे जोपासली जात आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी ड्रायव्हर गणेश मंडळ नेहमी पुढाकार घेते. मंडळाकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक बँड पथक आणले जाते. विविध देखावे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्यावर भर दिला जातो. आगामी काळातही विविध सामाजिक उपक्रम घेण्यासाठी मंडळ अग्रेसर राहणार असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी आकर्षक मूर्ती
ड्रायव्हर गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात आकर्षक मूर्तीची स्थापना केली जाते. ग्रामीण तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पाहण्यास गर्दी करत. विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी चारठाणा येथील प्रसिद्ध बँड पथकाला पाचारण करीत उत्सवात रंग भरण्याचा प्रयत्न केला जातो.
धार्मिक देखावे आणि झाकी
१९८३ ते २०००च्या काळात मनोरंजनाची साधने कमी असल्याने धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी मंडळाकडून विविध झाकी आणि देखावे सादर केले जात असत. गणेश भक्त आणि नागरिक देखावे आणि झाकी पाहण्यासाठी गर्दी करतात.
विविध पुरस्काराने मंडळ सन्मानित
गणेश मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, खासगी सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मंडळाला पारितोषिके देऊन गौरविण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने १९९०ते १९९५ या काळात प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.