Video : परभणी रेल्वेस्थानकातील वेटिंग रूम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 07:12 PM2019-12-05T19:12:58+5:302019-12-05T20:00:51+5:30
दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लागली आग
परभणी- शहरातील रेल्वेस्थानकामधील सामान्य प्रतीक्षालयाला गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी स्थानकात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. स्थानक प्रशासनाने प्रवाशांना पांगवून अग्नीशमन दलाच्या सहाय्याने ही आग अटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत प्रतीक्षालयाचे मोठे नुकसान झाले.
येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर सामान्य प्रतीक्षालय, त्या शेजारीच स्वच्छतागृह आहे. गुरुवारी दुपारी काही प्रवासी प्रतीक्षालयातील खुर्च्यावर बसलेले होते. त्याच वेळी ४.३० वाजेच्या सुमारास पाठीमागील बाजुने धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या प्रतीक्षालयास समोरील बाजुने काचेचे दरवाजे बसविलेले आहेत. प्रतीक्षालयात आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील प्रवाशांची धावपळ झाली. बाहेर पडण्यासाठी एकच गोंधळ सुरु झाला. पाहता पाहता आगीचे लोट मोठ्या प्रमाणात वाढले.
आग लागल्याचे समजताच रेल्वे प्रशासनाने सर्व प्रथम या परिसरातील प्रवाशांना दूर अंतरावर पांगविले. त्यानंतर अग्नीशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अवघ्या काही मिनिटांत अग्नीशमनचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आली. मात्र तोपर्यंत प्रतीक्षालयातील आसन व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक वायरिंग, पंखे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.