पोलीस व्हायचय, सज्ज व्हा, रविवारी तृतीय पंथीयांची शारीरिक चाचणी
By राजन मगरुळकर | Published: March 18, 2023 02:13 PM2023-03-18T14:13:55+5:302023-03-18T14:14:14+5:30
पोलीस शिपाई संवर्गातील ७५ पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाली.
परभणी : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महिला व पुरुषांची शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी जानेवारी महिन्यात पूर्ण झाली. दरम्यान, पोलीस शिपाई पदासाठी जिल्ह्यातील तीन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या ३ तृतीयपंथीय उमेदवारांची शारीरिक चाचणी रविवारी सकाळी सात वाजता पोलीस मुख्यालय येथे होणार आहे.
जिल्हा पोलीस दलातील ७५ जागांसाठीच्या भरती प्रक्रियेत एकूण चार हजार २०२ पुरुष उमेदवारांनी अर्ज केले होते तर ७५८ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. पोलीस शिपाई संवर्गातील ७५ पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाली. यातील एक हजार २५ उमेदवारांची तात्पुरती यादी लेखी परीक्षेसाठी पोलीस विभागाने जाहीर सुद्धा केली. तृतीयपंथी उमेदवारांसाठीच्या प्रक्रियेला पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार राबविले जाणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्या आस्थापनेवर तीन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या उमेदवारांची पोलीस मुख्यालय मैदान येथे रविवारी सकाळी सात वाजता शारीरिक चाचणी होणार आहे. यासाठी सर्व संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी केले आहे.
पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार प्रक्रिया
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील सूचनेनुसार पोलीस शिपाई या पदासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तिकरिता घ्यावयाच्या शारीरिक चाचणीचे निकष गृह विभागाने अधिसूचनेद्वारे निश्चित केले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे.