नांदेडसाठी दिग्रस बंधाऱ्यातून सोडले पाणी; पालम तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:02 PM2018-12-22T17:02:55+5:302018-12-22T17:04:30+5:30
पात्रात पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पालम (परभणी ) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील दिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी आज सकाळी सहा वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 20 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला असून यामुळे येथील पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला आहे. पाणी शिल्लक नसल्याने गोदावरी काठचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातील पाण्याचासाठा नेहमीच गोदाकाठच्या गावांसाठी डोकेदुखी बनला आहे यावर्षी बंधाऱ्याच्या पात्रात 37 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा करण्यात आला होता या पैकी 25 दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते 22 डिसेंबर रोजी बंधाऱ्यात 26 दलघमी पाणीसाठा शिल्लक होता यापैकी नांदेड साठी 25 दलघमी पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली होती पण जिल्हाधिकारी शंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी सहा दलघमी पाणीसाठा शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे नांदेड साठी 26 दलघमी पैकी 20 दलघमी पाणी सोडण्यात आले. आज सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी 16 दरवाजा पैकी नऊ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
परिसरातील शेतकऱ्यांवर संकट
गोदावरीच्या पात्रात आता केवळ सहा दलघमीचा साठा शिल्लक राहिला असे दाखवले जात आहे. मात्र या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ शिल्लक राहिलेला आहे. पाणी सोडल्याने दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून पिकांची राखरांगोळी होण्याची भीती आहे. यावर्षी स्थानिकांना विचारात न घेता पोलिस प्रशासनाच्या बळाचा वापर करीत अचानक पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकर्यांना विरोध करण्यास वेळ मिळाला नाही गोदापात्रात कमी पाणीसाठा राहिल्याने गोदावरीचे वाळवंट होणार या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.