पिंगळगड नाल्याचे पाणी आठ तासांनी ओसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:17+5:302021-07-14T04:21:17+5:30
परभणी शहराला जोडणाऱ्या सर्वच मार्गावर रविवारी झालेल्या पावसाने पाणी आले होते. यामध्ये ताडकळस, पालम, मानवत तसेच गंगाखेडकडून शहरात येणाऱ्या ...
परभणी शहराला जोडणाऱ्या सर्वच मार्गावर रविवारी झालेल्या पावसाने पाणी आले होते. यामध्ये ताडकळस, पालम, मानवत तसेच गंगाखेडकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावर पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. जिंतूर व नांदेड रस्ता वगळता अन्य सर्व मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी दुपारी दोन ते रात्री ९ पर्यंत पावसाची संततधार सुरू होती. यामुळे वसमत रस्ता तसेच बसस्थानकासमोरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलावरून रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पाणी वाहत होते. हे पाणी सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ओसरले. यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
या भागातील वसाहतीत शिरले पाणी
शहरातील गजानन नगर, संत सेना नगर, आशीर्वाद नगर, क्रांती चौक, गांधी पार्क भागातील काही दुकाने, हडको, धाररोड, भीम नगर, साखला प्लॉट, दादाराव प्लॉट, कॅनॉल परिसर, अमरधाम स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या वसाहती व पाथरी रोड, जिंतूर रोड भागातील छोट्या-मोठ्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे अनेक घरांना पाण्याने वेढले होते. परिणामी, नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
महामार्गावरील दुभाजक फोडून काढले पाणी
परभणी शहरातील वसमत राष्ट्रीय महामार्गावर आर.आर. पेट्रोल पंप ते चिंतामणी महाराज मंदिर या रस्त्या दरम्यान दुचाकी पाण्यात जातील इतके पाणी वाहत होते. या रस्त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर रविवार सायंकाळपासून व्हायरल झाला होता. या रस्त्यावर सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत पाणी साचले होते. पाणी जाण्यासाठी वाट मिळत नसल्याने अखेर महापालिका व शहरातील काही संघटनांनी दुभाजक फोडून पाण्यास वाट करून दिली. यातील काही पाणी रामकृष्ण नगर व कल्याण नगर परिसरात शिरले होते.
खदान भरली पाण्याने
जिंतूर रस्त्यावरील अमरधाम स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या खदाणीत या पावसाने तुडुंब पाणी साचले होते. हे पाणी या भागातील अनेक घरांमध्ये शिरले. सोमवारी दुपारपर्यंत महापालिका स्वच्छता विभागाने या खदाणीतील पाण्याला वाट तर करून दिली, मात्र, उतारामुळे ते पाणी छोट्या मोठ्या घरांमध्ये शिरले.
कालवा जेसीबीने फोडला
शहरातील आशीर्वाद नगर भागीतील कॅनाॅलजवळ कालव्यावर पूल टाकण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू होते. यातच रविवारी झालेल्या जोरदार पावसाने अडविलेला प्रवाह या पाण्यामुळे फुटला. यातच हे पाणी या भागातील काही घरांमध्ये गेले. रात्री जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आ.डाॅ. राहुल पाटील, महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह महापालिका पथकाने रात्री ९.३० च्या सुमारास कालवा जेसीबीने फोडून पाण्याला वाट करुन दिली. सोमवारी दिवसभर कालव्यातील साचलेला गाळ, माती काढण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरू होते.
गांधी पार्कला पाण्याचा वेढा
शहरातील गांधी पार्क तसेच क्रांती चौक ह्या बाजारपेठेतील मुख्य वसाहती आहेत. या भागाकडे येणारे रस्ते उताराकडे काढण्यात आले आहेत. यामुळे शिवाजी चौक, गुजरी बाजार, सराफा दुकाने, बारबिंड गल्ली, कोमटी गल्ली तसेच भाजी मंडई येथून सर्व पाणी गांधी पार्कमधील उद्यानासमोरील रस्त्यावर येते. हाच प्रकार नेहमीप्रमाणे रविवारी झालेल्या पावसाने घडला. सुरुवातीच्या २ तासात झालेल्या पावसाने या भागातून पायी चालणेसुध्दा कठीण होऊन बसले होते. रात्री उशिरा हे पाणी ओसरले.