खेर्डा येथे २६ जून रोजी पाणी पेरणी परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:56+5:302021-06-19T04:12:56+5:30
खेर्डा येथील प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना कॉ. गणपत भिसे म्हणाले की, खेर्डा येथे दलित वस्तीचे पाणी तोडून येथील काही ग्रामपंचायत ...
खेर्डा येथील प्रकरणाच्या अनुषंगाने बोलताना कॉ. गणपत भिसे म्हणाले की, खेर्डा येथे दलित वस्तीचे पाणी तोडून येथील काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दलित व नवबौद्धांबाबत अपशब्द वापरले आहेत. काही दलित ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली आहे. त्यांना अपमानित करण्यात आले. या प्रकरणी पाथरी पोलीस स्थानिक नेतेमंडळींच्या आदेशानुसार काम करीत आहेत. त्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजता खेर्डा येथे पाणी पेरणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. या घटनेच्या ९४ वर्षांनंतरही दलितांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नव्या पिढीसमोर बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश घेऊन जाण्यासाठी चवदार तळ्याचे पाणी आणून त्या पाण्याची खेर्डा या गावात पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच पाणी पेरणी परिषद घेण्यात येणार असल्याचे कॉ. भिसे म्हणाले. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.