पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:42+5:302021-01-09T04:13:42+5:30
शहरात वाढला धुळीचा त्रास परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून ...
शहरात वाढला
धुळीचा त्रास
परभणी : शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास वाढला आहे. प्रत्येक रस्त्यावर धुळीचे लोट उडत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांतील माती वातावरणात मिसळून धूळ वाढत आहे.
पार्किंग सुविधेचा स्थानकावर बोजवारा
परभणी : येथील बसस्थानकात नवीन बसपोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी आणि अपुऱ्या जागेत बसगाड्या उभ्या केल्या आहेत. नातेवाइकांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना वाहने उभी करण्यासाठी या भागात पार्किंगची सुविधा नसल्याने अस्तव्यस्त वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना या वाहनांचा अडथळा सहन करावा लागत आहे.
चारही बाजूंचे रस्ते उखडल्याने तारांबळ
परभणी : शहरात येण्यासाठी चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- वसमत आणि परभणी- पाथरी या चारही मार्गांवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करून वाहतूक योग्य रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त
परभणी : ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या रबी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीजपुरवठा गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीने ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
एकाच खिडकीमुळे प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील रेल्वेस्थानकावर एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढविल्याने प्रवासी मोठ्या संख्येने तिकीट काढण्यासाठी स्थानकावर येत आहेत. मात्र, तिकीट खिडकी एकच असल्याने प्रवाशांना रांग लावून तिकीट काढावे लागत आहे. स्थानकावरील तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
पोलीस चौक्यांना अवकळा
परभणी : शहरातील पोलीस चौक्यांची दुरवस्था झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठाण्यापासून दूर अंतरावर असलेल्या ठिकाणी चौकीची उभारणी करण्यात आली होती. शहरातील विसावा पोलीस चौकीवगळता इतर पोलीस चौक्यांमध्ये कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे चौक्यांची दुरवस्था झाली आहे. उड्डाणपूूल परिसर, जुना मोंढा, बसस्थानक या भागातील पोलीस चौकी पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.