महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर
By मारोती जुंबडे | Published: February 26, 2024 06:13 PM2024-02-26T18:13:39+5:302024-02-26T18:14:19+5:30
प्रकाश आंबेडकर का म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे.
परभणी: महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली नसून केवळ आम्ही निमंत्रक आहोत. आम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये ३९ जागांवर कोणी लढायचे याची सहमती झाली आहे. २७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे. मात्र आमच्या पक्षाचा पुण्यामध्ये कार्यक्रम असल्याने या बैठकीला जाऊ शकत नसल्याचे सोमवारी परभणी शहरातील सावली विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर परभणी येथे आयोजित ओबीसीच्या एल्गार मेळाव्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंजि.सुरेश फड, डॉ. धर्मराज चव्हाण, सुरेश शेळके, प्रा. प्रवीण कनकुटे, रणजीत मकरंद हे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वास्तववादी आहे. ४० एकर जमीन असलेला मराठा आज दोन आणि तीन एकर जमिनीवर आलेला आहे. दुसरीकडे सरकार कृषी मालाला आधारभूत किंमतही देत नाही. त्यामुळे मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मात्र मराठा समाज आणि ओबीसीं या दोन्ही समाजाला आरक्षणाचे वेगवेगळे ताट असलं पाहिजे, असे म्हणाले.
जरांगे यांनी जालना लोकसभा अपक्ष म्हणून लढवावी
मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये न जाता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षाचा तिकीट घेऊ नये कारण त्या पक्षाची मर्यादा असते, त्यांची ध्येयधोरणे असतात. जरांगे पाटील यांना आपल्या आंदोलनात यश मिळवायचे असेल तसेच आंदोलन कायम ठेवायचे असेल तर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरले पाहिजे. अन्यथा निवडणुकीनंतर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होऊ शकते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाचा फॉर्म्यूला आमच्याकडे
वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सत्ता द्या आम्ही हा आरक्षणाचा प्रश्न सोडवू. आम्ही जो आरक्षणाचा फॉर्म्यूला तयार केला आहे. त्यामध्ये कोणत्याच घटकावर अन्याय होणार नाही. मात्र आम्ही सत्तेवर आल्यानंतरच तो फॉर्म्यूला सांगू आणि त्याची अंमलबजावणी करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.