आठवडी बाजाराला परवानगी नाही; पण दररोजच्या बाजारातील गर्दी हटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:40+5:302021-06-21T04:13:40+5:30

परभणी शहर व जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून अनलाॅक झाले आहे. यामुळे सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही ...

Weekly markets are not allowed; But the daily market crowd did not go away | आठवडी बाजाराला परवानगी नाही; पण दररोजच्या बाजारातील गर्दी हटेना

आठवडी बाजाराला परवानगी नाही; पण दररोजच्या बाजारातील गर्दी हटेना

Next

परभणी शहर व जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून अनलाॅक झाले आहे. यामुळे सर्व बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी व ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. यामध्ये परभणी शहरात दर शनिवारी शनिवार बाजार येथे आठवडी बाजार भरतो. सध्या हा बाजार १९ जून रोजी शहरात भरला नसल्याचे दिसून आले. तसेच दर गुरुवारी परभणीत भरणारा गुरांचा बाजारही कोरोनाच्या कालावधीपासून बंदच आहे. तो या अनलॉकमध्ये अद्याप सुरू झालेला नाही. असे असले तरी बाजारपेठेतील फळ-भाजीपाला, किराणा, कपडा व अन्य साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नियमांचे पालन न करता नागरिक बिनधास्त फिरण्यावर भर देत आहेत.

परभणी बाजारपेठेतील स्थिती

विनामास्क फिरणारे अधिक

शहरातील सर्वच बाजारपेठेत तसेच दुकानांमध्ये आणि रस्त्याने फिरणाऱ्या अनेक नागरिकांच्या चेहऱ्याला मास्क नसल्याचे दिसून आले. काही नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मात्र मास्क घालून फिरत असल्याचे दिसून आले.

ना सोशल डिस्टन्सिंग - शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजार समितीतील खत, बियाणे यांची दुकाने, राष्ट्रीयीकृत बँका येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे शनिवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान केलेल्या पाहणीत दिसून आले.

कोरोनाची भीतीही नाही

- सध्या शहर व परिसरात सर्व बाजारपेठ, व्यवसाय खुले करण्यात आले आहेत. असे असले तरी कोरोनाचे प्रमाण घटले आहे. मात्र, ते संपले नाही, याची साधी भीती नागरिकांना नसल्याचे पाहणीतून दिसून आले.

विक्रेतेही बेफिकीर - शहरात भाजीपाला, फळ यांचे हातगाडे जागोजागी ठाण मांडून बसतात, तसेच बाजारातील काही रस्त्यांनी बिनधास्त फिरून विक्री करतात. त्यांच्याकडून मास्क न घालता साहित्य विक्री केली जात आहे. यासह दुकानांमध्येही ग्राहकांची संख्या जास्त असताना नियमाकडे दुर्लक्ष केले जाते.

बाजारातील पथक गायब

शहरात सध्या आठवडी बाजार भरविण्यास परवानगी नाही. मात्र, दररोजच्या बाजारात गर्दी कायम आहे. अशावेळी महापालिकेचे पथक तपासणीसाठी बाजारात फिरणे आवश्यक आहे. मनपाने प्रभागनिहाय केलेली पथके पोलिसांच्या बंदोबस्तावर अवलंबून असल्याचे समजते. पोलीस सोबत असले तर कारवाई केली जाते. मागील ४ दिवसांत कोरोना चाचणी वगळता कोणतीही कारवाई मनपा पथकाने केली नाही.

Web Title: Weekly markets are not allowed; But the daily market crowd did not go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.