रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 07:31 PM2022-10-03T19:31:52+5:302022-10-03T19:33:10+5:30
पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे.
पाथरी ( परभणी): बैलांना पाच एवजी दहा कोरडे मारावे लागतात, मुलांना कोणी मुली देईनात किती आमदार आले खासदार आले मात्र आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. अगोदर रस्त्याचा प्रश्न सोडवा, असे जाहीर कार्यक्रमात आमदाराला डोंगर गावाच्या ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी एका गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथेचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांनी निवेदने, आंदोलने केली पण यश आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत गावाने रस्त्यासाठी निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. रस्ता नसल्याने गावात बस येत नाही. यामुळे अनेक अडचणीला ग्रामस्थ सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 3 किमीची पायपिट करावी लागत. कोणी आजारी पडले तर मोठी तारांबळ उडते. रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथरी मतदार संघाचे आमदार सुरेश वरपूडकर डोंगरगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम सुरू असताना गावातील एक नागरिक मध्येच उभा राहिला. रस्त्याची मागणी करत त्यान आमदारांवर प्रश्नांचा भडिमार केला. ग्रामस्थांनी व्यथा मांडताना तो म्हणाला, रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे नागरिकांचे हाल होत आहेत. खराब रस्त्यावरून बैलगाडी न्यायची तर बैलाला दहा चाबूक जास्तीचे मारावे लागतात. ऐवढेच काय, रस्ता नसल्याने गावातील मुलांचे लग्न होत नाहीत. मुलीकडील मंडळी नको बाबा म्हणत स्थळ टाळतात. यापूर्वी अनेक खासदार आमदार आले गेले पण रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, असेही तो म्हणाला.