गोविंद पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा कधी होणार? परभणीत ‘जवाब दो’ आंदोलनात सवाल
By मारोती जुंबडे | Published: February 20, 2023 06:58 PM2023-02-20T18:58:30+5:302023-02-20T18:59:06+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापपर्यंत खुनी आणि कटाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून शिक्षा करण्यात आलेली नाही.
परभणी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला सहा वर्षे झाले तरी त्यांचे खुनी आणि कटाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून शिक्षा न केल्याप्रकरणी परभणीत कॉम्रेड गोविंद पानसरे विचार मंचच्या वतीने सोमवारी ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार करण्यात आला. यामध्ये ते व त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमाताई पानसरे या गंभीर जखमी झाल्या. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे निधन झाले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. मात्र, या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापपर्यंत खुनी आणि कटाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करून शिक्षा करण्यात आलेली नाही. त्यामुळे परभणी येथे कॉम्रेड गोविंद पानसरे विचार मंचच्या वतीने सोमवारी सकाळी महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये विजयराव वाकोडे, कॉम्रेड राजन क्षीरसागर, रफीउद्दीन अश्रफी, सोनाली देशमुख, धर्मराज चव्हाण, नितीन सावंत, डॉ. सुनील जाधव, सारंग सावळी, शिवाजी कदम, माधुरी क्षीरसागर, संदीप सोळुंखे, शेख अब्दुल, मुंजाजी कांबळे यांच्यासह पानसरे विचार मंचाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी झालेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.